Ajit Pawar अजित पवारांची प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात भाषण: संविधानावर आधारित लोकशाही टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची

पुणे – प्रतिनिधी

विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेल्या भारताला जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही बनवणाऱ्या भारतीय संविधानाच्या बळावर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात सांगितले.पोलीस संचलन मैदानावर झालेल्या या सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह पोलीस अधिकारी, नागरिक आणि स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

अजित पवार यांनी स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात सैनिकांना वंदन करत गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी प्राण पणाल देणाऱ्या वीरांचे स्मरण केले. पुणे जिल्हा शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, आरोग्य, पायाभूत सुविधा, आयटी, ऑटो हब आणि स्टार्टअप्समध्ये आघाडीवर असून, देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली साधन असून, त्याने प्रत्येकाला समान अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य दिल्याने भारताची लोकशाही अधिक बळकट झाली आहे, असे पवार म्हणाले.

सोहळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एसआरपीएफचे सहायक उपनिरीक्षक प्रदीप सानंतु, पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे यांसारख्या पुरस्कारविजेत्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी पवार यांनी ‘स्वच्छ पुणे संकल्प-2026’ प्रचार रथाचे उद्घाटन केले. या मोहिमेतून कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याबाबत जनजागृती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *