पुणे -प्रतिनिधी
टी-२० वर्ल्ड कप २०२६ (T – 20 World Cup 2026) मध्ये माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला ग्रुप स्टेजमध्ये धक्कादायकरित्या स्पर्धेबाहेर पडावे लागले. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवांमुळे त्यांचा प्रवास संपला असून, झिम्बाब्वेने सुपर-८ मध्ये त्यांची जागा घेतली आहे, जी आता भारताच्या गटात सामील झाली आहे.सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीलंकेच्या हाताने झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य झिम्बाब्वे-आयरलंड सामन्यावर अवलंबून होते.
मात्र मंगळवारी (१७ फेब्रुवारी) पावसामुळे हा सामना रद्द झाला, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया (Austrelia) बाहेर पडली आणि झिम्बाब्वेने सुपर-८ मध्ये प्रवेश केला. यामुळे सुपर-८ चे सात संघ निश्चित झाले असून, भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे ग्रुप-१ मध्ये आहेत, तर इंग्लंड, श्रीलंका व न्यूझीलंड ग्रुप-२ मध्ये. पाकिस्तान-अमेरिका यांच्यातील आजच्या (१८ फेब्रुवारी) सामन्याने आठवा संघ ठरेल.
टीम इंडियाचं सुपर-८ (Team India Super – 8 ) शेड्यूल आता स्पष्ट झाले असून, २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होईल. २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध आणि १ मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी संध्याकाळी ७ वाजता भारत खेळेल. सुपर-८ फेरी २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, भारताचा प्रवास दुसऱ्याच दिवशी सुरू होईल.
