पुणे -प्रतिनिधी
महाराष्ट्रात बारामती (Baramati) विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी जोरकस सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरावलोकन कार्यक्रम जाहीर केला असून, १ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणीकृत मतदारच मतदान करू शकतील. आयोगाने १० मार्चला अंतिम प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर शिक्कामोर्तब केले असून, पक्षाच्या कोअर कमिटीच्या मुंबईतील बैठकीत यावर एकमत झाले. पक्ष बिनविरोध निवडणुकीवर भर देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते.दरम्यान, आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवार म्हणून मांडण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. २३ फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel )यांच्या निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटी बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवार (Parth Pawar )यांच्या नावावर शिक्का रोखण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होते.अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांनी राजभवनात राज्यपालांकडून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या पहिल्यांदा सहभागी होत आहे
