पुणे -प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad )जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आरटीओ (RTO) महिला अधिकारी आणि कॅब चालक यांच्यात झालेल्या वादाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल () झालेल्या व्हिडिओनंतर कॅब चालकाविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल झाली असून, पोलिस तपास करत आहेत.
घटना नाशिक फाट्याहून निगडी दिशेने घडली. कॅब चालकाने रॅश ड्रायव्हिंग करताना महिला आरटीओ (RTO) अधिकाऱ्याला अपशब्द वापरले आणि हात मुरगळला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने चालकाला गाडी आडवी घालून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने मोबाईलवर व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. चालकाने मात्र अधिकाऱ्यावर शिवीगाळ आणि मारहाणीचे आरोप करत रात्रभर कोठडीत ठेवल्याचा दावा केला होता.महिला अधिकाऱ्याने मात्र सर्व आरोप फेटाळले. “चालकाने प्रथम अपशब्द वापरले आणि हात मुरगळला.
तो अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून खोटी प्रतिमा निर्माण करत आहे,” असे त्या सांगतात. सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.पिंपरी पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अधिक तपशील येण्यास बाकी आहेत.
