पुणे ग्रामीण- प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात काळीज पिळवटणारी घटना घडली आहे. पतीच्या वारंवारच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला त्रस्त झालेल्या ३० वर्षीय भाग्यश्री राजू जाधव यांनी ६ वर्षांच्या मुलगा सार्थक राजू जाधव आणि अवघ्या ४ महिन्यांच्या तान्ह्या मुलगी गौरी राजू जाधव यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. (Pune crime)
या दर्दनाक घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी (shikrapur police station)पती राजू पांडुरंग जाधव (३२) याला अटक करून गजाआड केले आहे.मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील हे जाधव कुटुंब पोटापाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील वीटभट्टीवर काम करत होते. मात्र, पती राजू आणि पत्नी भाग्यश्री यांच्यात सतत भांडणे होत्या. रविवारी सकाळीही त्यांच्यात कडकडितून भांडण झाले. रोजच्या या कटकटीने वैतागलेल्या भाग्यश्रीने रागाच्या भरात दोन्ही मुलांना घेऊन सायकलवर घर सोडले. दुपार उलटून संध्याकाळ झाली तरी त्या घरी न परतल्याने पती राजूने शोधाशोध सुरू केली. घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीच्या काठावर सायकल आणि चपला सापडल्या. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पाहिले तेव्हा तिघांचेही मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिस कारवाई आणि तपास:
शिक्रापूर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. भाग्यश्रींच्या बहिणी जयश्री जाधव यांच्या फिर्यादीवरून पती राजू पांडुरंग जाधव याच्याविरुद्ध ‘पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा’ गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पतीच्या पार्श्वभूमी, भांडणांची नेमकी कारणं आणि इतर संशयितांची माहिती घेतली जात आहे.या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
एका क्षुल्लक वादातून आणि कौटुंबिक कलहामुळे दोन निष्पाप मुलांचा आणि एका मातेचा बळी जाणे हे अत्यंत दुखद आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण (Pune gramin)भागात वाढत असलेल्या कौटुंबिक हिंसेमुळे महिलांची दयनीय अवस्था झाली आहे. समाजाने जागे होऊन कौटुंबिक समस्यांसाठी वेळीच मदत मागावी आणि पुरुषप्रधान मानसिकतेवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
