पुणे -प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा अधिकृत कार्यभार हाती घेतला. अजितदादांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी दादांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे.सुनेत्रा पवार यांनी प्रथम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारले.
डीपीडीसी बैठका आणि जनता दरबारासारखे कार्यक्रम सुरू ठेवत त्यांनी तात्काळ धडाका दाखवला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांशी संवादात त्या भावूक झाल्या. “दादांच्या मनातलं स्वप्न साकारण्याची संधी मला मिळाली. ही केवळ पदाची जबाबदारी नाही, तर त्यांच्या विचारांची पुढची पायरी आहे,” असे सांगत हेलावल्या. “मला कधीच वाटलं नव्हतं मी इथे भाषण करेन, पण परिस्थितीने समोर उभं केलं,” असेही त्यांनी म्हटलं.कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil), माजी आमदार रमेश थोरातसह मान्यवर उपस्थित होते. त्यांचं भावनिक भाषण सोशल मीडियावर वायरल झालं असून संयमी भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.दादांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या, “दादांनी शेवटची निवडणूक म्हणून सांगितलं होतं. जनतेच्या प्रश्नांसाठी रान करणं, विकासासाठी धडपडणं हे त्यांचं आयुष्य होतं.
सकाळी लवकर उठून दौऱ्यावर निघणं हे त्यांचं स्वरूप होतं. त्यांच्या अचानक जाण्याने आपण पोरके झालो.” दादांचं कामावरील निस्सीम प्रेम प्रेरणास्थान असल्याचं सांगत, “मी सगळं बाजूला ठेवून ही जबाबदारी घेतली. लोकहित आणि विकासाची गती कायम ठेवणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली,” असे त्या पुढे म्हणाल्या.
