पुणे – प्रतिनिधी
खासगी फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चार तरुणींमधील वाद चरमसीमेला पोहोचला. रूममेट्सनी चोरीचा आरोप लावून बदनामी करण्याची धमकी दिली आणि आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने १९ वर्षीय पायल किशोर राजगुरु हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदननगर (ChandanNagar Suicide) पोलीसांनी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवर तिघा रूममेट्सवर गुन्हा नोंदवला आहे.(Payal Rajguru)
पायल राजगुरु (वय १९, रा. अरिहंत कॉम्प्लेक्स, महावीर सोसायटी, (Mahavir Society) विठ्ठलनगर, मूळ रा. कासार अंबोली, मुळशी तालुका) ही नर्सिंग कोर्सचा अभ्यास करत होती. चंदननगर भागातील अरिहंत कॉम्प्लेक्सच्या एका फ्लॅटमध्ये ती सबुरी संतोष काळे (२५), शिवानी शाम आजबले (२६) आणि दीपाली (सर्व रा. विठ्ठलनगर) या तिघींसोबत राहत होत्या. आरोपी महिला खासगी नोकऱ्या करतात.
पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सदनिकेतून काही पैसे आणि एक मोबाइल संच चोरीला गेला होता. यानंतर आरोपींनी पायलवरच चोरीचा संशय घेतला. तिला बदनामी करण्याची धमकी दिली आणि तिच्या आई-वडिलांकडे तक्रार करू, असा इशारा दिला. या मानसिक ताणामुळे पायलने ९ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला.(Pune Crime)
त्यावेळी सदनिकेतील एक आरोपी व्यायामाला गेली होती. सकाळी नऊच्या सुमारास ती परत आली तेव्हा पायलचा मृतदेह सापडला. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पायलने लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. त्यात आरोपींच्या चोरीच्या आरोप आणि धमक्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. पायलचे वडील किशोर राजगुरु यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक दशरथ तलेदवार तपास करत आहेत.(Suicide Note)
या घटनेमुळे विठ्ठलनगर परिसरात खळबळ उडाली असून, पायलच्या नातेवाइकांकडून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिस तपासात चोरीचा आरोप खरा आहे की फक्त पायलला त्रास देण्यासाठी केला गेला, याचा तपशील समोर येणार आहे.(WomenSafety)
