Accident दौंडमध्ये ४ वर्षांच्या आर्यनचा रोड रोलरखाली दुर्दैवी मृत्यू

 

दौंड – प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील जनता कॉलनी भागात सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असताना एक हृदयद्रावक घटना घडली. ४ वर्षांचा आर्यन जाधव नावाचा चिमुकला रोड रोलरच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मजुरी करणाऱ्या पालकांवर दुःखाचा महापूर आला आहे.

आर्यनची आई स्वतः या डांबरीकरणाच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होती, त्यामुळे कुटुंबातील एकमेव आधार गमावण्याचा आघात त्यांना सहन होत नाही.घटनेची माहिती अशी आहे की, रोड रोलर चालकाने काम लवकर उरकण्याच्या घाईत वाहनाचा वेग वाढवला होता. यामुळे त्याच्यावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर खेळत असलेला आर्यन थेट रोलरच्या चाकाखाली सापडला. अपघात इतका भयानक होता की, बालकाला वाचवण्याची कोणतीही संधीच उरली नाही.

घटनानंतर घाबरलेला चालक रोड रोलरसह घटनास्थळावरून पळून गेला. दौंड पोलिसांनी तात्काळ कारवाई करून तक्रार नोंदवली असून, आरोपी चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नव्हत्या, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे.

डांबरीकरणासारखे धोकादायक काम सुरू असताना रस्ता पूर्णपणे बंद करणे, सुरक्षेसाठी कठडे उभारणे, सूचनाफलक लावणे किंवा बालकांना दूर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, विभागाने हे सर्व उपेक्षित केले आणि प्रशासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन करून काम चालू ठेवले. यामुळे निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला. स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी विभागावर कारवाईची मागणी केली असून, आर्यनच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्याची चर्चा सुरू झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *