पुणे -प्रतिनिधी
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हडपसर येथील एका घरात झालेल्या ४७ लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हे शाखा युनिट सहाने उलगडा केला आहे.(Crime Branch) घरातील देवघरातून सोन्याचे दागिने आणि मोठ्या रकमेची रोकड चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे.(Pune Police )
देवघरातून निघाली मोठी रक्कम
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.३० या कालावधीत हडपसर येथील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीतील एका घरात चोरट्याने शिरून देवघराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तेथून त्याने सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली.(Hadapsar
)
घरमालकांना घटनेची जाणीव झाल्यानंतर हडपसर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली. सुरुवातीला चोरीची रक्कम ३८ लाख ५४ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरच्या तपासात एकूण ४७ लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचे उघड झाले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट सहाने हाताळला. पोलिस निरीक्षक संतोष शेटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीवर आरोपीचा माग घेतला.
सलग दहा दिवस तपास केल्यानंतर आरोपी रोहित ऊर्फ पिल्या प्रवीण पवार (वय २५, रा. म्हातोबाची आळंदी) याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी रोहित पवार हा म्हातोबाची आळंदी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार संतोष राठोड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या शोधासाठी कारवाई केली आणि आरोपीला ताब्यात घेतले.
तपासात आरोपीने हडपसर येथील घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यात ७ लाख ५४ हजार रुपयांची रोकड आणि २५.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. एकूण ४७ लाख रुपयांच्या मुद्देमालाची किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई उपायुक्त (गुन्हे) गोहेर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष शेटे, सहाय्यक निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्यासह पथकाने केली. दिवाळीच्या काळात घडलेल्या या मोठ्या चोरीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात कौशल्यपूर्ण केल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे .
