पुणे -प्रतिनिधी
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाच्या तपासातून उत्तमनगर पोलिसांनी (UttamNagar Police) शहरातील मेफेड्रोन ड्रग्ज रॅकेटचा (Mephedrone Racket) पर्दाफाश केला. मुख्य विक्रेत्यांकडून ड्रग्ज घेणाऱ्या ७६ जणांचा सुगावा लागला असून, ते सध्या पोलिसांच्या लक्ष्यावर आहेत.
उत्तमनगर पोलिसांनी सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या (२८), राजन गोपाल नायर (३७), जतीन जयवंत कदम (२६, वारजे), शुभम संतोष दहिभाते (२८, कोंढवे धावडे) यांना अटक केली. त्यांच्याकडून ८.१९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त झाले. ही कारवाई पोलिस उपायुक्त संभाजी कदम (Pune Police )यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर, उपनिरीक्षक अक्षय पाटील व पथकाने केली.
अपहरण गुन्ह्यात ८ महिन्यांपासून फरार असलेल्या राठ्या राठोडवर लक्ष केंद्रित केल्यानंतर कोंढवे धावडे येथे त्याला पकडण्यात आले. त्याच्या झडतीत मेफेड्रोन पुड्या सापडल्या. चौकशीत त्याने अनेक मुलांना ड्रग्ज विक्री केल्याचे कबूल केले आणि तीन पुरवठादारांची नावे सांगितली, ज्यामुळे उर्वरित आरोपींना अटक झाली.
राठोडच्या मोबाईल तपासात ४ महिन्यांत ३०० ट्रान्झॅक्शन आढळले. २-२५०० रुपयांचे पैसे ड्रग्ज विक्रीतून मिळाले, तर १०-१५ हजारांचे पेमेंट पुरवठादारांना केले गेले. यातून ७६ ड्रग्जखोरांचा तपशील समोर आल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
या कारवाईने पुण्यातील ड्रग्ज संस्कृतीवर मोठा फटका बसला असला तरी तरुणांना विळख्यात घालणाऱ्या रॅकेट्सचा धोका कायम आहे. उत्तमनगर पोलिसांकडून पुढील तपास जोरदार चालू असून, रडारवरील ७६ संशयितांना लवकरच अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
