पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील खराडी (Kharadi) येथील खांदवेनगरमधील फॉर्च्युन सिटी परिसरात गॅस सिलिंडर जोडत असताना झालेल्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघी किरकोळ जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रेग्युलेटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली असून, गॅस सुरक्षेबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
या स्फोटात विष्णू मुंजाजी गित्ते (Vishnu Gitte)(वय ८०), वृंदाविनी विष्णू गित्ते (Vrindavni Gitte) (वय ६०) आणि पांडुरंग विष्णू गित्ते (Pandurang Gitte)(वय ३५, सर्व रा. खांदवेनगर, खराडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पांडुरंग गित्ते हे नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. स्फोटाच्या वेळी घरात असलेली पांडुरंग यांची पत्नी राजश्री (वय ३२) आणि मुलगी निहारिका (वय ६) या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Kharadi)
माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर संपल्याने वृंदाविनी गित्ते या नवीन सिलिंडरची जोडणी करत होत्या. त्या वेळी रेग्युलेटरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली.(Khandvenagar) गॅसचा वास आल्याने विष्णू गित्ते आणि पांडुरंग हेही किचनमध्ये धावले. घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी सिलिंडर गॅलरीत बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत त्यांनी तो स्वयंपाकघरातून उचलून हॉलमध्ये आणला; मात्र तेवढ्यात हॉलमधील देवघरात पेटलेल्या दिव्याच्या ज्योतीचा संपर्क गॅसशी येताच संपूर्ण घरात साठलेल्या एलपीजीने पेट घेतली आणि भीषण स्फोट झाला.
स्फोटाचा प्रचंड आवाज होताच शेजाऱ्यांनी धाव घेऊन अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवले. गंभीर जखमी अवस्थेतील तिघांना तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र दुपारी पांडुरंग गित्ते, त्यानंतर वडील विष्णू गित्ते आणि सायंकाळी आई वृंदाविनी गित्ते यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. या दुर्घटनेतून राजश्री गित्ते आणि मुलगी निहारिका थोडक्यात बचावल्या असून राजश्री यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.(Gas Cylinder Blast)
स्फोटामुळे गित्ते यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किचन, हॉल, स्वच्छतागृह, शौचालय, गीझर, खिडक्या, दारे आणि घरातील फर्निचर जळून खाक झाले असून,(Fire Brigade) आगीच्या तीव्रतेमुळे जमिनीवरील फरशाही उखडल्या आहेत. (Pune City)घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी वेळेवर दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. स्फोटानंतर जागीच झालेल्या बघ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे सुरुवातीच्या बचावकार्यात काही अडथळे निर्माण झाले होते. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण खराडी परिसरात शोककळा पसरली आहे.(Disaster Response)
