पुणे -प्रतिनिधी
मुंबई–बंगळूर महामार्गालगत वारजे परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) छापा टाकून एका अल्पवयीन मुलीसह (Minor Rescued) एका महिलेची सुटका केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी (Sex Racket) महिलांची व्यवस्था करणाऱ्या महिला एजंटला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आश्लेषा सचिन सोमणकर (Ashlesha Somanakar) (वय ३४, रा. वारजे, मूळ राहणार माहिम, मुंबई) हिच्यावर भारतीय न्याय संहिता, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ४ जून रोजी वारजे येथील मुंबई–बंगळूर महामार्गालगत असलेल्या ‘साई एक्झिक्युटिव्ह लॉजिंग अँड बोर्डिंग’ (Sai Executive Lodging And Boarding)मध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती एएचटीयू पथकाला प्राप्त झाली.
यानंतर पोलिस निरीक्षक छगन कापसे (Chhagan Kapse) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीयरीत्या पडताळणी करून बनावट ग्राहकाच्या मदतीने माहिती खरी असल्याची खात्री केली. त्यानंतर लॉजवर अचानक छापा टाकण्यात आला.(POCSO Act) या कारवाईदरम्यान वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका अल्पवयीन मुलीची तसेच एका महिलेची सुटका करण्यात आली आणि त्यांना संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आले.
घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एजंट आश्लेषा सोमणकर ही महिलांना पैशाच्या आमिषाने लॉजमध्ये आणत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिचा पुढील तपासासाठी पोलिसांनी ताबा घेतला असून, आणखी कोणी या रॅकेटमध्ये सहभागी आहे का, याची चौकशी सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांच्या मार्गदर्शनाखाली, अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे (Chhagan Kapse) व त्याच्या पथकाने केली आहे .
