Pune Crime : अमनोरा मॉलमध्ये कॉल सेंटरच्या आडून लाखोंची लूट ; पोलिसांनी टाकला छापा; दोघाना अटक

पुणे – प्रतिनिधी

मुंढवा पोलिसांनी तब्बल १५ दिवस गुप्त तपास करून हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरात मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या पाच कॉल सेंटरवर छापे टाकले.(Online Gaming Fraud) या कारवाईत फसवणुकीसाठी वापरले जाणारे कॉल सेंटरचे जाळे (Call Cente Racket) उद्ध्वस्त करण्यात आले असून, दररोज सुमारे ३०० ते ४०० जणांची ३० ते ४० लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. ही कॉल सेंटर्स गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. (Mundhwa Police)

या प्रकरणात संतोष दत्ता वेंजणेकर (Santosh Venjanekar) (वय ४७, रा. पार्क इन्फिनिया सोसायटी, भेकराईनगर, मूळ रा. वेजणे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि विनायक उर्फ दीपक मनोहर इक्के (Vinaya kIkke) (वय ४०, रा. सिल्व्हर वूड सोसायटी, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे.(Hadapsar) त्यांना मध्यरात्री प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यांचा प्रमुख साथीदार अमित मजेटिया हा दुबईमध्ये असून, भागिरथ पांड्या हा त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

कॉल सेंटरमध्ये काम करणारे निदा आरीफ अन्सारी, पुनम अनंत भालके, अनुजा शरद जाधव, रविंद्र कृष्णा कुरळे, अक्षय झिबु पाटील, विवेक विलास जाधव, प्रांजल अनिल मिश्रा आणि सागर कैलास उसरे यांच्यासह एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमनोरा चेंबर्स, अमनोरा मॉल, भेकराईनगरमधील ‘अ‍ॅपेक्स अ‍ॅचीव्हर’ आणि ‘जे के एल इंडिया सोल्युशन’ अशा पाच ठिकाणी सलग १७ तास पंचनामा व तपासाची कारवाई करून गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला. मुंढवा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज राजेंद्र पोमम यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमनोरा चेंबर्समध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरमधून नागरिकांना फोन करून कंपनीच्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन गेमिंग खेळण्यास प्रवृत्त केले जात होते. सुरुवातीला नागरिकांकडून काही गेम जिंकवून घेत त्यांचा विश्वास संपादन केला जात होता; त्यानंतर सातत्याने गेम हरवून अधिक पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जात होते. या कॉल सेंटरमध्ये संतोष वेंजणेकर याने तरुणांकडून पॅनकार्ड, आधारकार्ड घेऊन त्यांत फेरफार करून सीमकार्ड घेतली, बनावट बँक खाती उघडली आणि त्यांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केल्याचेही समोर आले आहे.

छाप्यात हार्ड डिस्क, एसएसडी, ऑटो डायलर मशीन, सीम कार्ड, सर्व्हर रूममधील हार्ड डिस्क, कागदपत्रांच्या फाईली, कंपनीचे शिक्के, बँक खात्यांची चेकबुक- पासबुक, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, सीसीटीव्ही डीव्हीआर, ग्राहक संभाषण स्क्रिप्ट, सीम बॉक्स, सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम, विविध बँकांची डेबिट व एटीएम कार्डे, पॅनकार्ड, मोबाईल फोन तसेच एक पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉल सेंटरमध्ये पाच अल्पवयीन मुला-मुलींनाही कामाला ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर काम करून घेण्यात येत असल्याचेही उघड झाले असून त्याबाबतही स्वतंत्र तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *