पुणे – प्रतिनिधी
अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या खराडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाने पानटपरी चालकाकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई क्रमांक ८५६७ आकाश अरुण मुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त अबीनाश कुमार यांनी हे आदेश दिले आहेत.(Pune Police )
खराडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आकाश मुळे यांची ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत झेनसार रोड परिसरात ड्युटी नेमण्यात आली होती. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.(Police Suspension )
या दरम्यान झेनसार आयटी पार्कसमोरील के. एन. स्मोक व्हॅली या पान शॉपवर मुळे यांनी कारवाई केली. पान शॉप चालक कुमार नारायणकर यांच्या लेखी जबाबानुसार, १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.१० वाजता ते दुकानात सिगारेट विकत असताना मुळे तेथे आले. सिगारेट विक्री केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित साहित्य पिशवीत घेऊन चालक निघत असताना मुळे यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.(CorruptionCase )
३०० रुपये स्वीकारल्याचा आरोप
नारायणकर यांच्या जबाबानुसार, मुळे यांनी दरमहा ५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळी नारायणकर यांनी सध्या ३०० रुपये देतो आणि उर्वरित २०० रुपये नंतर देतो, (Pune News) असे सांगितले. त्यानंतर मुळे यांनी ३०० रुपये स्वीकारल्याचे जबाबात नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्रपाळी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे यांनी संबंधित पान शॉप चालकाला खराडी पोलीस ठाण्यात बोलावून त्याची माहिती घेतली. त्यानंतर त्याचा लेखी जबाब नोंदविण्यात आला.
निलंबन आदेशानुसार, अनधिकृत आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना संबंधित पोलीस शिपायाने कारवाई न करता आस्थापना चालकाकडे पैशांची मागणी करून ते स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. शासकीय कर्तव्य बजावताना गैरवर्तन केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
