पुणे : प्रतिनिधी
पोलीस वारंट
पुणे शहर पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे (वय ५०) यांचे शुक्रवारी (ता. २५) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पहाटे साडेअडीचच्या सुमारास गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तेलंगे हे हडपसर परिसरातील रहिवासी होते. त्यांची वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयातील सहाव्या विभागात त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. या ठिकाणी काम करताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या. तसेच गोपनीय विभागात कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या होत्या.
गुरुवारी रात्रीची ड्युटी संपल्यानंतर तेलंगे घरी गेले होते. त्यानंतर पहाटे साडेअडीचच्या सुमारास ते गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत बसले होते. त्यावेळी अचानक त्यांना चक्कर आली. कार्यकर्त्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
तेलंगे यांच्या आकस्मिक निधनाने पुणे शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यनिष्ठ, हुशार आणि धाडसी सहकारी गमावल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आहेत.
