Hinjewadi Spa Center : बाहेरून काहीच कळत नव्हतं, सगळं गुपचूप सुरू होतं, धाड टाकली अन् दोन महिला सापडल्या

पुणे – प्रतिनिधी

हिंजवडीतील भुजबळ वस्ती (Bhojbal Vasti) येथील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोन महिलांची सुटका केली आहे. (Hinjewadi) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भुजबळ वस्ती येथील ‘ब्ल्यू डायमंड रिलॅक्स स्पा सेंटर’ (Blue Diamond Relax Spa)मध्ये ही धाड टाकण्यात आली. या प्रकरणी स्पाचा चालक मारुती ज्ञानेश्वर मुरडे (Maruti Murade) आणि व्यवस्थापक वैशाली संतोष चव्हाण (Vaishali Chavan) यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, वैशाली चव्हाण हिला पोलिसांनी अटक केली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांना या स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोपनीयरीत्या पडताळणी करण्यात आली. माहितीची खात्री करण्यासाठी डमी ग्राहक पाठवण्यात आला आणि व्यवहाराची पुष्टी झाल्यानंतर संशयित स्पा सेंटरवर अचानक छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करून त्यांना संरक्षणासाठी संबंधित यंत्रणांकडे सोपवण्यात आले.

संबंधितांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (Ant iHuman Trafficking)कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यावर्षी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शहरातील विविध स्पा सेंटर आणि इतर ठिकाणी १६ छापेमारी कारवाया केल्या असून, त्यामधून पिटा कायद्यान्वये गुन्हे नोंदवत आतापर्यंत ३८ जणांना अटक आणि ३७ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्पा सेंटरविरुद्ध कठोर भूमिका घेत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Vinay Kumar Chaubey) यांनी यावर्षी चार स्पा सेंटरवर एक वर्षासाठी बंदी घालण्याची कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (Rohidas Pawar) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे (Vishal Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *