पुणे -प्रतिनिधी
बालगंधर्व रंगमंदिरात सप्टेंबरमध्ये झालेल्या ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याच्या बहाण्याने पाच लाख रुपयांची खंडणी मागत, ‘बिग बॉस मराठी’ Bigg Boss Marathi फेम रीलस्टार दिव्या शिंदे Divya Shinde यांनी साथीदारांसह पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (वय ६५) यांच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे .
याप्रकरणी दिव्या शिंदे (Divya Shinde Case )(रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०८(४), ३३३, १०९(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि ३२४(४) अन्वये काळेपडळ Kalepadal Police पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,करुणादीप फाउंडेशनच्या वतीने १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे आणि गायकवाड यांना संस्थेकडून कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासही तिला कोणी सांगितले नव्हते. मात्र, प्रसिद्धी केल्याचे सांगून ऑगस्टपासून तिने गायकवाड यांच्याकडे फोन व संदेशांद्वारे पाच लाख रुपयांची मागणी केली.Karunadip Foundation
१७ सप्टेंबरला दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि अन्य काही जण गायकवाड यांच्या घरी गेले. ते घरी नसल्याने पत्नी व मुलाला दमदाटी करून ते निघून गेले. २३ सप्टेंबरला ढमढेरे याने फोन करून गायकवाड यांना हॉटेल ब्ल्यू नाईन येथे बोलावले. तेथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देण्यात आली.
२४ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड घरी एकटे असताना ढमढेरे तेथे आला. दरवाजा उघडताच दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण घरात घुसले. त्यांनी गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “माझा माणूस पैसे घेण्यासाठी आला होता; तू पैसे का दिले नाहीस?”, त्यानंतर त्यांना जिवंत सोडू नका, अशा आशयाची चिथावणी देण्यात आली.
गायकवाड यांनी आपण पक्षाघाताचे रुग्ण असल्याचे सांगून मारहाण थांबविण्याची विनवणी केली. मात्र, एकाने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्याने मारहाण करण्यात आली. गायकवाड यांच्या पत्नीबाबत धमकी देत त्यांचे तुकडे करण्याची धमकीही देण्यात आली.
काही वेळाने मुलगा व सून घरी आल्यानंतर त्यांनाही दमदाटी करण्यात आली. पाच लाख रुपये न दिल्यास कार नेण्याची धमकी देत गायकवाड यांची कार घेऊन आरोपी निघून गेले. घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. गंभीर जखमी गायकवाड यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.
डॉ. विद्याधर गायकवाड यांनी स्पष्ट केले की, ते २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले असून करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेने केले होते; त्यांना किंवा संस्थेकडून दिव्या शिंदे यांना कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासही तिला कोणी सांगितले नव्हते. तरीही त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली आणि हल्ला केला, असे त्यांनी सांगितले.
