पुणे -प्रतीनीधी
सेनापती बापट रस्त्यावरील प्रसिद्ध जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या व्यवस्थापकाविरोधात परदेशी नागरिकाच्या वास्तव्याची माहिती वेळेत नोंदवली नसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इटलीच्या एका नागरिकाची माहिती तब्बल ३९ दिवस ११ तास (९४७ तास) उशिराने नोंदवल्याचा आरोप आहे.
चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार विशाल बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इटलीचा नागरिक ७ जून २०२६ रोजी हॉटेलमध्ये दाखल झाला होता, परंतु त्याची माहिती १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी नोंदवण्यात आली.
परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती २४ तासांच्या आत संबंधित यंत्रणेकडे सादर करणे बंधनकारक असते. मात्र, हॉटेल प्रशासनाने ही माहिती जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे उशिराने नोंदवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५’च्या कलम २३(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील करत आहेत. माहिती उशिराने नोंदवण्यामागचे नेमके कारण आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
