पुणे -प्रतीनीधी
संशायचं भूत डोक्यात शिरलं कि माणसाला काशाचही भान राहत नाही याचा भीषण प्रत्यय पुण्यातील लोणी काळभोर (LoniKal bhor Police)परिसरातून समोर आला आहे .चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर अमानुष अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीच्या क्रूरतेची घटना कदमवाकवस्ती (Kadamwak Vasti) (ता. हवेली) येथे घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शितल शरद वारे (वय ३४) यांनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी (ता. ८) सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमावले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संशय आणि कौटुंबिक हिंसाचारामुळे (Domestic Violence) एका संसाराचे अवशेष उरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकरणी शरद विठ्ठल वारे (Sharad Ware)(वय ३७, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) याला लोणी काळभोर पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली आहे. गोरख संजय वारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शितल वारे यांच्या मृत्यूनंतर आता खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शरद वारे हा दारूच्या नशेत पत्नी शितल यांच्याशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिच्यावर शिवीगाळ करत होता आणि “आज तुला मारून टाकतो,” अशा धमक्या देत होता. भांडण पहाटे विकोपाला गेल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता शरद वारे याने शितल यांच्या मोबाईलवरून गोरख वारे यांना फोन करून, “माझे आणि शितलचे खूप भांडण झाले, तिच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले,” असे सांगत फोन कट केला.(Crime Agains tWomen)
गोरख वारे आणि शितल (Sheetal Ware) यांच्या बहिणीने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हनुमान मंदिरासमोरील पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आल्यानंतर प्रकाराची गंभीरता स्पष्ट झाली. त्यानंतर त्यांनी विश्वराज रुग्णालयात चौकशी केली असता शितल यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली. ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगत त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले; मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
पत्नीवर हल्ला केल्यानंतर शरद वारे घटनास्थळावरून फरार झाला होता. लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने पथके तयार करून तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतले. शितल वारे यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात खुनासह भारतीय न्याय संहितेतील इतर गंभीर कलमे लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येने कदमवाकवस्ती परिसर हादरला असून, एका क्षुल्लक संशयाने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची आणि कौटुंबिक हिंसाचाराचे भीषण वास्तव पुन्हा समोर आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
