पुणे -प्रतिनिधी
बारामतीतील पणदरे येथे अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . एका ३० वर्षीय विवाहित महिलेची डोक्यावर व चेहऱ्यावर धारदार अथवा अन्य हत्याराने वार केल्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .
खून झालेल्या महिलेचे नाव वैशाली तानाजी पवार Vaishali Tanaji Pawar (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) असे आहे . (Baramati News)
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्यापूर्वी पणदरे गावच्या हद्दीत तानाजी लक्ष्मण पवार यांच्या घरातील झोपण्याच्या खोलीत ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून वैशाली पवार यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केल्यानंतर टॉवेलने गळा आवळण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांनी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घटनास्थळी पाहणी सुरू केली. रविवारी पहाटे २.५० वाजेपर्यंत घटनास्थळी तपासाची कार्यवाही सुरू होती. या घटनेमुळे पणदरे परिसरात खळबळ उडाली असून, महिलेच्या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी त्यांची सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) BNS 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
