पुणे -प्रतिनिधी
राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा पास होऊन अनेक भोंदूबाबांचा छळ सुरुच असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात २९ वर्षीय विवाहित महिलेचा अंधश्रद्धेच्या नावाखाली छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला . पतीला मंगळदोष असल्याचे सांगून तो नाहीसा करण्यासाठी पत्नीला पतीच्या प्रायवेट पार्टची हळदी-कुंकू लावून त्याची पूजा करण्यास अशी अघोरी कृत्य करण्यास महिलेला भाग पाडल्याचे तक्रारीत आरोप करण्यात आले आहेत .
या प्रकरणी 29 वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .(Chandannagar Police)
विवाह ठरण्यापूर्वी सासरच्या मंडळींनी १५ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप महिलेने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Women Harassment)
तक्रारीनुसार, महिलेचा विवाह ठरण्यापूर्वीच तिच्या कुटुंबीयांकडे १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मुलीचा विवाह व्हावा, यासाठी तिच्या वडिलांनी २ लाख २० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले. मात्र, उर्वरित रक्कम न दिल्याच्या कारणावरून विवाहानंतर महिलेचा कथित छळ सुरू झाला.
दरम्यान, महिलेच्या पतीला मंगळदोष असल्याचे सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आले. हा दोष दूर करण्यासाठी एका कथित भोंदूबाबाच्या सांगण्यावरून महिलेला अंधश्रद्धेवर आधारित विविध विधी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. कथित विधीचा भाग म्हणून अंगारा पाण्यात मिसळून पिण्यास भाग पाडण्यात आले.(Fake Baba ) तसेच पतीच्या खासगी अवयवाला हळद-कुंकू लावून पूजा करण्यासही तिला प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार महिन्यांपासून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. मंगळदोष दूर झाल्याचे सांगून सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदवून घेण्यास नकार दिला. तसेच मंगळदोष दूर करण्याच्या कारणाखालीच आपल्याशी विवाह करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे.(Domestic Violence )
सासरच्या छळाला कंटाळून महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा, संबंधित फौजदारी कलमे आणि महाराष्ट्रातील अंधश्रद्धा व अमानुष प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
