पुणे -प्रतिनिधी
गुन्हे शाखेच्या पोलिसानी उल्लेखनीय कामगिरी करत परराज्यात जाऊन खून व मोक्का प्रकरणातील चार वर्षापासून
फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या . या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिस दलाचे कौतुक होत आहे .
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोईनुद्दीन जाफर शेख उर्फ मोईन कालू शेख (वय 28) असे आहे. त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात खुनासह शस्त्र कायद्याअंतर्गत तसेच खंडणी आणि मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी कर्नाटकात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या युनिट-४च्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेतला. आरोपी वारंवार मोबाइल क्रमांक बदलत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर वेशांतर करून पोलिसांनी बंगळुरूपासून बेळगावपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि बेळगावमधून त्याला ताब्यात घेतले.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता.
कर्नाटकातील ठिकाणांचा माग काढला
तपासादरम्यान आरोपी कर्नाटकात असल्याची माहिती युनिट-४च्या पथकाला मिळाली. त्याला गांजाचे सेवन आणि विक्रीची सवय असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कर्नाटकातील मागील चार वर्षांतील नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये २०२४ मध्ये आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
आरोपी वारंवार मोबाइल क्रमांक बदलत असल्यामुळे त्याचा माग काढणे कठीण झाले होते. मात्र, तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तो थानागुंडी आणि बंगळुरू परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
वेशांतर करून पाळत
११ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथक खासगी वाहनाने बंगळुरूकडे रवाना झाले. आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी वेशांतर केले. पथकातील एक कर्मचारी चहा विक्रेत्याच्या, तर दुसरा मेकॅनिकच्या वेशात परिसरात पाळत ठेवत होता.
दरम्यान, पोलिसांचा संशय आल्याने आरोपी तेथून निसटला. तांत्रिक माहितीच्या आधारे तो बंगळुरूहून बेळगावच्या दिशेने जात असल्याचे समजल्यानंतर पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. आरोपी सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत असल्याचा संशय असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून धावत्या वाहनात कारवाई करण्यात आली नाही.
बेळगावमध्ये सापळा रचून अटक
बेळगाव येथे मालमारुती पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. त्यानंतर श्रीनगर चिल्ड्रेन गार्डन परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याची ओळख निश्चित करण्यात आली. संबंधित दोन्ही गुन्ह्यांमधील त्याच्या कथित सहभागाबाबत पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, सहायक पोलिस फौजदार प्रवीण राजपूत, एकनाथ जोशी तसेच पोलिस कर्मचारी अमजद शेख, तुषार खराडे, अनिकेत भोसले, जहांगिर पठाण आणि विठ्ठल वाव्हळ यांच्या पथकाने केली.
