पुणे -प्रतिनिधी
पोलीस वारंट
द्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol)यांच्या सुरक्षा ताफ्यात भरधाव कार घुसवून त्यांच्या वाहनाला धोकादायक पद्धतीने कट मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३२ वर्षीय कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभम विजय वनीत (रा. नाना पेठ) असे संबंधित चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे विमानतळावरून शिवाजीनगरमार्गे कोथरूड येथील निवासस्थानी जात होते. त्यावेळी त्यांचा वाहनताफा संचेती चौकातून जात असताना शुभम वनीत याने मद्यप्राशन करून भरधाव आणि बेदरकारपणे कार चालवत ताफ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.(Shivajinagar Police )
ताफ्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चालकाला कार थांबविण्याचे वारंवार इशारे दिले. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष करून वाहनांमधून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या वाहनाला धोकादायकरीत्या कट मारल्याचा आरोप आहे (Drunk Driving) परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी चालकाला तत्काळ ताब्यात घेतले.
मंत्र्यांच्या सुरक्षा पथकात कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ताब्यात घेतलेल्या चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने मद्यप्राशन केल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १८५ आणि ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक विकास काटे पुढील तपास करीत आहेत.
