पुणे -प्रतिनिधी
पुण्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून (५ सप्टेंबर) रात्री कात्रजमधील आंबेगाव परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतनाच आज पुन्हा कोंढवा (Kondhwa) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोठी बातमी समोर येत आहे .(PuneCrime )
वैमनस्यातून तरुणावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली .सौरभ अनिल त्रिबंके (Saurabh Trimbake) (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोह उर्फ चिक्क्या सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात सौरभ त्रिंबके जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सौरभ आणि त्याचा मित्र सागर पंधरकर हे गणपती मंडळाच्या मांडवाजवळ गप्पा मारत उभे होते. सागर पंधरकर याच्याशी आरोपींचे पूर्वी वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून आठ ते दहा जणांचा टोळका मांडवाजवळ आला. त्यांनी सौरभला शिवीगाळ केली. त्यानंतर देशी बनावटीच्या पिस्तुलातून त्याच्यावर गोळीबार केला. गोळी सौरभच्या पायात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला.
गोळीबारानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजवली. जखमी सौरभला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र डोके हे तपास करत आहेत.
आरोह उर्फ चिक्क्या सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
गोळीबाराची दुसरी घटना :
कात्रजमधील आंबेगाव परिसरात शनिवारी (५ सप्टेंबर) रात्री सोसायटीच्या आवारात तरुणावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात चंद्रकांत रामदास माने (वय २०, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, भेंडी चौक, आंबेगाव बुद्रुक) हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चंद्रकांत हा सोसायटीच्या आवारात थांबला होता. त्यावेळी पाच जणांचा टोळका आला आणि त्यांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून त्याच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने चंद्रकांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी कात्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, इतर दोघे फरार आहेत. अधिक तपास कात्रज पोलीस करत आहेत.
