पुणे -प्रतिनीधी
पुण्याच्या चंदननगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे . उधारीचे अवघे 600 रुपये परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या मित्राने मित्राच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला आहे या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. रक्ताने माखलेल्या टॉवेल व ब्लँकेटचा तुकड्यामुळे आरोपी सापडला आहे.(ChandanNagar)
राहुल राजेंद्र जवंजाळ(Rahul Rajendra Javanjal)(वय 22) खून झालेल्या मित्राचे नाव असून आशीष डेव्हीड मगर (Ashish DavidMagar) (वय 27, रा. येरवडा) हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. चंदननगर भागात ही घटना घडल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की प्राथमिक चौकशीत राहुलचा मित्र आशीष मगर याने राहुल स्वतः घरातील चाकूने जखमी झाल्याचे सांगितले. राहुलने फोन करून ‘मला लागले आहे’ असे सांगितल्याने आपण त्याच्या खोलीखाली गेलो आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेल्याचा दावा आशीषने पोलिसांकडे केला होता.(Pune Crime)
परंतु , घटनास्थळी रक्ताचे डाग आढळणे, चाकू, रक्ताने माखलेला टॉवेल व ब्लँकेटचा तुकडा मिळणे आणि आशीषच्या कपड्यांवरही रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने विविध नमुने व मुद्देमाल जप्त केला. राहुलला रुग्णालयात नेण्यासाठी वापरलेली अॅक्टिव्हा दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली.(Pune Murder)
चाकूचा वार झाल्यानंतर राहुलच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. घाबरलेल्या आशीषने टॉवेलने जखम दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुलला इमारतीखाली आणून अॅक्टिव्हावर बसवून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर राहुल बेशुद्ध होऊन दुचाकीवरून खाली पडला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातून त्याला प्रथम निरामय हॉस्पिटल आणि त्यानंतर मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालामुळे संशयाला बळ
राहुलच्या शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू छातीच्या डाव्या बाजूला झालेल्या चाकूच्या वारामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि धक्क्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले. घटनास्थळी मिळालेले परिस्थितीजन्य पुरावे, आशीषच्या चौकशीत समोर आलेली माहिती आणि शवविच्छेदन अहवाल यामुळे राहुलने आत्महत्या केल्याचा सुरुवातीचा दावा संशयास्पद ठरला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आशीष डेव्हीड मगर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील अधिक तपास पोलिस करत आहेत .
