पुणे – प्रतीनीधी
मुलाच्या सतत दारू पिऊन घरात धिंगाणा घालणे, घरी आई-वडिलांना मारहाण करणे व नेहमी त्रास देणे या बाबीला कंटाळून वडिलांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याचे वारजे माळवाडी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.(Pune Crime )
महेश भागवत गायकवाड (Mahesh Gayakwad) (वय ३०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भागवत सूर्यभान गायकवाड (Bhagwat Gayakwad) (वय ६४) आणि पार्वती भागवत गायकवाड (Parvati Gayakwad)(वय ६०) अशी अटक केलेल्या आई-वडिलांची नावे आहेत. याबाबत त्यांचा दुसरा मुलगा गणेश भागवत गायकवाड (वय ३४, रा. रामनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली.
नेमक काय आहे प्रकरण ?
महेश दररोज दारू पिल्यानंतर वडिलांशी तसेच आईशी वाद घालत असत. घटनेच्या दिवशी (दि. २४ ऑगस्ट) रात्री तो दारू पिऊन घरी आला. त्याने नॉनव्हेज खाण्यावरून वाद घालण्यास सुरूवात केली. श्रावण सुरू असल्याने वडिलांनी त्याला नॉन व्हेज नसल्याचे सांगितले. नंतर त्याने पैशांची मागणी केली. पण वडिलांनी त्याला पैसे देण्यासही नकार दिला.
त्यावेळी वडीलांशी वाद घालण्यास सुरूवात केली. दररोज त्यांच्यात वाद होत असत. त्यामुळे शेजारी राहणारा भाऊने याकडे दुर्लक्ष केले. परंतु, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भागवत यांनी महेशच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण केली. तसेच, त्याचा गळा दाबला होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी महेश त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे भाऊ तसेच नातेवाईकांनी पाहिले, तेव्हा तो बेशुद्ध असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi)घटनास्थळी धाव घेतली व त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवविच्छेदनात महेशचा गळा दाबून व डोक्यात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. नंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. भाऊ व नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली. वडिल व आईकडेही विचारणा करण्यात आली. पण, त्यांनी काहीच सांगितले नाही. मात्र, पोलिसी पद्धतीने तपास केल्यानंतर महेशचा खून वडिलांनी केल्याचे समोर आले. पोलिसांनी वडिलांना पकडले. तर मारहाणीत सांडलेले रक्त पुसून तसेच संबंधित घटना लपविल्याप्रकरणी आईला देखील अटक करण्यात आली. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
