उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत उरुळी कांचन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्री सव्वाबारा ते एकच्या सुमारास श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ घडली.
गणेश रतन दाभाडे (वय ४९, रा. सासवड, ता. पुरंदर) असे मृत सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला. त्याचा शोध उरुळी कांचन पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई आशिष संजय उल्हाळकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरातील पांढरस्थळ येथे शुक्रवारी सकाळी पाण्यात वाहून आलेल्या एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दाभाडे हे पोलिस शिपाई आशिष उल्हाळकर यांच्यासोबत पुण्यातील ससून रुग्णालयात गेले होते. (Pune Accident) ओळख पटली नसल्याने मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला.(Uruli Kanchan)
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून दाभाडे आणि उल्हाळकर हे रात्री उशिरा सरकारी दुचाकीवरून उरुळी कांचनकडे परतत होते. उरुळी कांचनजवळ आल्यानंतर दाभाडे यांनी जेवण केले नसल्याचे सांगितले. (Road Accident) त्यामुळे ते श्रीकृष्ण मंगल कार्यालयाजवळ उतरले आणि जेवणासाठी महामार्ग ओलांडून पलीकडे जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.(Pune Solapur Highway)
धडकेनंतर वाहनाचे चाक दाभाडे यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
गणेश दाभाडे यांनी पौड, भोर, सासवड, जेजुरी आणि उरुळी कांचन पोलिस ठाण्यांत सेवा बजावली होती. शांत, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सहकाऱ्यांना सदैव प्रोत्साहन देणाऱ्या दाभाडे यांच्या निधनाने पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
