by priya gaikwad
पुणे -राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित (Santosh Pandit) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
पंडित यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत केलेली काही टीकात्मक वक्तव्ये असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. या व्हिडिओप्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.(Kothrud News )
तक्रारीच्या आधारे कोथरूड पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या कारवाईनंतर राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.(Court Update)
पंडित यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. जामीन मंजूर झाल्याने त्यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार आहे.(Public Reaction)
सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, व्हिडीओमधील शब्दांचा वापर कोणत्याही हेतुपुरस्सर गैरवापरासाठी केलेला नाही. तसेच संबंधित महिलेच्या लज्जेचा अनादर करण्याचा कोणताही हेतू आरोपीचा नव्हता. दाखल गुन्ह्यांचे स्वरूप आणि कायद्यात नमूद असलेल्या शिक्षेची तरतूद लक्षात घेता आरोपीला अधिक काळ कोठडीत ठेवण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
संतोष पंडित यांच्या जामीन आदेशातील दोन प्रमुख अटी पुढीलप्रमाणे आहेत :
तक्रारदार महिलेशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क साधता येणार नाही.
खटल्यातील पुराव्यांमध्ये छेडछाड करता येणार नाही किंवा तपासावर कोणताही परिणाम करण्याचा प्रयत्न करता येणार नाही.
याशिवाय, न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला आहे.
